Top News

नगरच्या बायपास रोडवर परप्रांतीय दरोडेखोरांची टोळी पकडली



नगर - तलवारीसह चाकू, सुरे, गलोल, फायटर, मिरची पूड अशी घातक शस्रे घेवून दरोडा टाकण्यासाठी चाललेली परप्रांतीय दरोडेखोरांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. विळद घाट ते शेंडी बायपास रोडवर शेंडी गावच्या शिवारात हॉटेल किनारा जवळ गुरुवारी (दि.१०) रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना गुरुवारी (दि.१०) रात्री माहिती मिळाली की, काही संशयित इसम २ वाहनांतून एमआयडीसी कडून शेंडी कडे बायपास रोडने जात असून त्यांच्याकडे घातक शस्रे आहेत.ही माहिती मिळताच पो.नि. आहेर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बायपास रोड कडे कारवाई साठी रवाना केले. या पथकाने शेंडी बायपास चौकाकडून एमआयडीसी कडे जाणाऱ्या बायपास रोडने संशयित इसमांचा शोध सुरु केला. हॉटेल किनाराच्या पुढे १०० मीटर अंतरावर पोलिसांना २ संशयित वाहने दिसली. या पथकाने ही वाहने पकडून त्यात पाहणी केली असता त्यात काही इसम बसलेले होते, त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे तलवारीसह चाकू, सुरे, गलोल, फायटर, मिरची पूड, लाकडी दांडके अशी हत्यारे मिळून आली. त्यामुळे पोलिसांनी या ११ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले.

यामध्ये अरशद हसन खान (वय-३७ रा. अलवार शिवाजीपार्क राज्यस्थान), मोबीन जगमाल खान (वय-४३), अहमद उस्मान खान (वय-३८), हासिम बसरु खान (वय २५), अलीम करीमउद्दीन खान (वय- ४४), अडबर नुह, मोहमंद आरिफ जोरमल (वय ३८), खलील महमंद इसराईल खान (वय-३५), सुनिल रामअवतार कुमार (वय-२४), ताजमंहमद रहेमान (वय-४५),  खर्शिंद मंगल खान (वय-४५), रईस इसाक खान (वय- ४५, सर्व रा.हरियाणा) या आरोपींचा समावेश आहे तर त्यांचे दोन साथीदार मोहमंद अफजल जोरमल व तय्यब मंगलखान (रा.बुबल्हेरी पिनानग्वा नुह राज्य हरियाणा) हे दोघे फरार झाले आहेत.

या टोळीकडून पोलिसांनी तलवारीसह चाकू, सुरे, गलोल, फायटर, मिरची पूड, लाकडी दांडके असे दरोड्याचे साहित्य, मोबाईल, एक टाटा कंपनीचा ट्रक व एक आयशर कंपनीचा ट्रक असा सुमारे ३५ लाख ६२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळी विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात पो.काँ. किशोर शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि.कलम ३९९, ४०२ सह आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post