Top News

एकतर रस्त्यांची कामे सुरू करा नाहीतर नागरिकांनी भरलेला कर परत करावा

आठ दिवसात काम न झाल्यास महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात उपोषणाचा मनविसेचा इशारा



अहमदनगर - केंद्र सरकारपासून ते महापालिकापर्यंत सर्व संस्थांना सर्वाधिक कर भरणार्‍या शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी सध्या खराब रस्त्यांमुळे नरकयातना सहन करत आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटल शेजारील रस्त्यांची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे काम ८ दिवसांच्या आत सुरू करा किंवा नागरिकांनी कररूपाने भरलेले पैसे त्यांना परत करा अन्यथा महापालिका आयुक्तांच्या दालनात उपोषणास बसण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले असून त्यात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी म्हटले आहे की, शहरातील सर्वच रस्त्यांची दाणादाण उडालेली असताना मनपा प्रशासनाने कोणतेही कठोर पाऊल या रस्त्यांसाठी उचलले कधी नगरकरांना दिसले नाही. माणिकनगर भागातील आनंदऋषीजी हॉस्पिटल शेजारी रस्ता शेवटचा कधी चांगला पाहिला होता ते या भागातील रहिवाशांना देखील आठवत नाही म्हणजे आपणच याचा विचार करावा की परिस्थिती काय असेल? शहरामध्ये ज्या लोकांचा महापालिकेच्या कराशी महावितरणाच्या पैशाची कसलाही संबंध नाही, कर बुडवे आणि वीज चोरी करणार्‍या गोष्टींमध्ये उच्च स्थानावर असलेल्या भागांमध्ये तुफान विकास कामे, रस्ते, पाणी, लाईट इतर सोयी सर्व भरभरून पुरवले जाते आणि शहरात ज्या भागातून सर्वात जास्त उत्पन्न वेळच्यावेळी सर्व कर भरून सुध्दा या भागाच्या पदरी नेहमी निराशा चालली आहे असे का असावे? सहिष्णू असल्याचा किंवा धिंगाणा न घालण्याचा हा परतावा त्या लोकांना मिळत आहे का?.

शहराचा व्यापारी वर्ग या भागात राहतो वर्षानुवर्षे रस्त्यांची तीच परिस्थिती. आपण यावेळी ही या शहरात जबाबदार पदावर काम केले होते तेव्हा हिच परिस्थिती होती हे तुम्हाला देखील कळाले असेल. या अशा रस्त्यांबाबत जर बोलायचं नसेल तर आंदोलना खेरीज पर्याय नाही. आता तरी भागातील लोकांच्या यातना दूर करा येत्या ८ दिवसात या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आपल्या दालनात उपोषणासाठी बसणार आहे. एक तर सर्व सुविधा सर्वांना मिळाली पाहिजे नाही तर लोकांनी भरलेला कर त्यांना परत द्यावा त्या पैशातून आम्ही रस्त्या तयार करून घेऊ, असे वर्मा यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post