Top News

जुन्या पेन्शनसह प्रलंबीत मागण्यांसाठी सरकारी कर्मचार्‍यांची शहरातून निघाली मोटरसायकल रॅली

सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी, खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणास संघटनांचा विरोध 


अहमदनगर - मार्चमध्ये झालेल्या बेमुदत संप स्थगित करण्यासाठी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने जुन्या पेन्शनसह अन्य महत्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने बुधवारी (दि.९ ऑगस्ट) क्रांती दिनानिमित्त शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जलसंपदा विभाग कार्यालयातून सकाळी या मोटारसायकल रॅलीचे प्रारंभ झाले. यामध्ये सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनील पंडित, वैभव सांगळे, वंदना नेटके, डॉ. मुकुंद शिंदे, सुरेखा आंधळे, सांदीपन कासार, भाऊसाहेब शिंदे, नलिनी पाटील, विलास पेद्राम, सुधाकर साखरे, विजय काकडे, गिरीश गायकवाड, गणेश कोळकर, महादेव शिंदे, संदीप बनसोडे, धनसिंग गव्हाणे, विष्णू काटकर, नितीन मुळे, मंजुषा बागडे, वैशाली बोडखे, पूनम जाधव, अजय दळवी, समीर शेख, विशाल कुंभार, सुजाता सुतार, सयाजी व्हावळ, उमेश डावखर, निशा भामरे, जिल्हा रुग्णालयाचे काळदाते, अक्षय बेळगे, पांडुरंग गवळी, पि.डी. कोळपकर, पुरुषोत्तम आडेप, बी.एम. नवगन, देविदास पाडेकर, सोनाली झरेकर आदींसह सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. 

विविध प्रलंबीत मागण्यांचे फलक हातात घेऊन सरकारी कर्मचार्‍यांनी शहरातून रॅली काढली. यावेळी जुनी पेन्शनचा व इतर न्याय हक्काच्या मागण्या मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅली डिएसपी चौक, कोठला, जुने बस स्थानक, टिळक रोड, दिल्ली गेट, लालटाकी, सावेडी, गुलमोहर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे परिसरात या मोटार सायकल रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात सरकारच्या चालढकलपणाचा निषेध नोंदवला. जुनी पेन्शन संबंधात अभ्यास करून अहवाल सादर करण्यास्तव शासनाने नियुक्त केलेल्या समितीला दिलेली मुदत १४ जून रोजी संपुष्टात आली आहे. तर वाढीव मुदतही संपत आली आहे. तरी अपेक्षित अहवाल अद्याप प्राप्त होऊ शकलेला नाही. जिव्हाळ्याच्या मागण्याबाबत एकही चर्चासत्र अद्याप आयोजित करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचारी, शिक्षक संतप्त असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणास विरोध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. पोलीस खात्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याची शासनाच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय जखमेवर मीठ चोळणारा आहे. सदर घातकी निर्णय तात्काळ रद्द करावा. तत्कालीन परिस्थितीत केलेल्या विनंतीस मान देऊन बेमुदत संप स्थगित करण्यात आला होता. चार महिन्यांचा कालावधी लोटून देखील मुख्यमंत्र्यानी आश्वासनाची पूर्तता केलेली नसल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जुनी पेन्शनसाठी नियुक्त त्रिसदस्यीय समितीची अहवाल सादर करण्याची वाढीव मुदत १६ ऑगस्टला संपत असून, यापुढे मुदत वाढ देऊ नये, सरकारने सकारात्मक कारवाई करून भावी काळातील संघर्ष टाळण्यासाठी दिलेल्या आश्वासनानुसार निर्णायक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post