Top News

नगरमधील माजी सैनिकाचा खून करून मृतदेह लोणीप्रवरा जवळ फेकला

अहमदनगर - नगरच्या बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या सेवानिवृत्त लष्करी जवानाचा प्लॉटच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत खून करुन त्याचा मृतदेह राहाता तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला फेकून देत पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी सेंधवा, मध्यप्रदेश येथे पकडले आहे. मनोज वासुमल मोतीयानी (वय ३३) व स्वामी प्रकाश गोसावी (वय २८, दोघे रा. सावेडी गाव, अ.नगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. 

राहता तालुक्यातील लोणी ते तळेगाव रोडवर गोगलगाव शिवारात रविवारी (दि.३०) दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावर असलेल्या जखमांच्या खुणामुळे या व्यक्तीचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यामुळे लोणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदरचा मृतदेह नगर शहरातून शनिवारी (दि.२९) बेपत्ता झालेले माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर (वय ४५ रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा, मूळ रा.अकोळनेर ता.नगर) यांचा असल्याचे समोर आले आहे. 

सदरची घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पो.ना.रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पो.कॉ.रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे पथक नेमुन सदर ना उघड खुनाचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन माहिती घेताना पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसुन आले त्या आधारे पथकाने आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास सुरु केला. पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसुन आली पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पो.नि.दिनेश आहेर यांना शनिवारी (दि.२९) तोफखाना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर मधील मिसिंग व्यक्ती विठ्ठल नारायण भोर हे बेपत्ता असले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मिसिंगमधील व्यक्ती व अनोळखी मयत इसम यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने, पो.नि.आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन मिसिंग इसमाबाबत सविस्तर माहिती घेणे बाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग इसम नामे विठ्ठल भोर यांचे बाबत माहिती घेत असताना त्याचे मनोज मोतीयानी यांचे बरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दोघामध्ये वाद झाले असले बाबत माहिती मिळाली. 

सदर महितीचे अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी याचा शोध घेतला परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कार मधुन त्याचा साथीदार स्वामी गोसावी यास सोबत घेवुन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती घेतली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत त्यांच्या सोबत तोफखान्याचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके व त्यांचे एक पथकही मध्यप्रदेश कडे रवाना झाले. या पथकांनी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथे जावुन आरोपींना पकडले.

त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दि.२९ रोजी माझी पांढरे रंगाची हुंडाई आय-२० कार मधुन जाताना निंबळक, ता. नगर येथे मनोज मोतीयानी व मयत यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार स्वामी गोसावी याचे मदतीने मयताचे छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्याचा खुन केला व मयताचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिल्याची कबुली दिली. 

आरोपी मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण ६ गुन्हे दाखल आहेत

Post a Comment

Previous Post Next Post