कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चार दिवसात जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती आ. लाड यांनी दिली आहे. उंबरे (ता. राहुरी) येथे झालेल्या धर्मांतराच्या घटनेसंदर्भात आ. लाड यांनी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आ. लाड यांनी सोवारी (दि. ३१) नगरमध्ये येऊन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्थेसंदर्भात तसेच घडलेल्या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर बोलताना आ. लाड म्हणाले की, धर्मांतराची संवेदनशील अशी घटना घडूनही त्याबाबत गुन्हा दाखल होण्यास तब्बल १३ तास लागले. आता गुन्हा दाखल होऊन घटनेची पोलिस महासंचालकांर्फत चौकशीही सुरू झालेली आहे. परंतु नगर जिल्ह्यात हिंदूविरोधी घटना वारंवार का घडत आहेत. ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे नगर जिल्ह्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना होताहेत की नाही? भाजप हा हिंदूंच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे. हिंदुत्वाच्या आड जो येईल, त्याला आम्ही धडा शिकवू, असा इशाराही आ. लाड यांनी दिला.
उंबरेतील घटनेची चौकशी सुरू असून, त्यास जबाबदार असणार्या अधिकार्यांवर कारवाई केली जात असून, त्यांची चौकशीही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिल्याचे आ. लाड यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी भाजप पदाधिकारी सतर्क राहतील. हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसारासाठी भाजप कटीबद्ध असल्याचे आ. लाड म्हणाले.
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सुवेंद्र गांधी, अक्षय कर्डिले, बाबासाहेब वाकळे, रविंद्र बारस्कर, सचिन पारखी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, आनंदा शेळके, युवराज पोटे, उदय अनभुले, बंटी ढापसे आदी उपस्थित होते.
Post a Comment