Top News

महापालिका आयुक्तांच्या नावे बनावट व्हॉट्सअप अकाउंट



नगर - अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे नावे बनावट व्हॉट्सअप अकाउंट कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सुरू केले असून यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा फोटो वापरला आहे. या द्वारे डॉ. पंकज जावळे यांच्या परिचित व्यक्ती,मित्र परिवार,कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांना मेसेज द्वारे पैश्याची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.३१) समोर आला आहे.

दिवसभरात महापालिकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच आयुक्त जावळे यांचे परिचित असलेले व्यक्ती, मित्र परिवार यांना व्हॉट्सअप वर अशा प्रकारचे मेसेज आले. सदरचे मेसेज हे +998939811860 या नंबर वरून आलेले असून आर्थिक मागणी केली गेली आहे. तरी या फेक मेसेजला कोणीही प्रतिसाद देऊ नये किंवा आर्थिक व्यवहार करू नये. आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून सावधान व सतर्क राहावे , असे आवाहन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

याप्रकारच्या फसवणुकीत विदेशी नंबर असतात यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी .सुरवातीला या फेक नंबर द्वारे आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते. नंतर आर्थिक मागणी केली जाते,.तरी या नंबर पासून सर्वांनी सतर्क राहावे. व फेक कॉल,मेसेज,फेसबुक, ट्विटर द्वारे आर्थिक मागणीला बळी पडू नये व सतर्क राहावे. आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचे 9422084677 व 9422962144 हे अधिकृत मोबाईल नंबर आहेत या व्यतिरिक्त दुसरे नंबर नाहीत. असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

सोशल मीडियावर वापरात असलेल्या विविध अॅपवर बनावट अकाउंट तयार करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सदस्य, नातेवाईक वा मित्रांकडून पैसे लाटण्याचे उद्योग आता सर्रास सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातून आता उच्च पदावरील प्रशासकीय अधिकारीही सुटले नसल्याचे समोर येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडल्याचे समोर आल्यानंतर आता महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या नावानेही बनावट व्हॉट्सअप अकाउंट तयार झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post