Top News

नगरमध्ये माल घेवून आलेल्या टेम्पो चालकाला लुटले



नगर - टेम्पोमध्ये लाकूड भरुन नगर मधील टिळक रोड येथील सॉ मीलमध्ये घेवून आलेल्या टेम्पो चालकाला २ इसमांनी मारहाण करत लुटल्याची घटना शुक्रवारी (दि.४) पहाटे १ च्या सुमारास पटेल मंगल कार्यालयाजवळ घडली.

याबाबत स्वप्निल रावसाहेब गंगावणे (रा.कवडाणे, ता.कर्जत) याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गंगावणे याच्या कुटुंबियांचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी गुरुवारी (दि.३) रात्री कर्जत येथून टेम्पोसह लाकूड भरले व ओम लाला शिंगाडे, तुकाराम आबा शिंगाडे यांना सोबत घेवून ते लाकूड नगर मधील टिळक रोडवर असलेल्या उमेश घुले यांच्या वखारीत घेवून येत होते. 

पहाटे १ च्या सुमारास हॉटेल राज पॅलेस पासून पटेल मंगल कार्यालयाकडे त्यांचा टेम्पो जात असताना समोरुन मोटारसायकलवर दोन इसम आले. त्यांनी मोटारसायकल रस्त्यावर टाकून गंगावणे यांच्याजवळ येत ‘‘तुझ्याकडील सर्व पैसे दे’’ असे म्हणत तोंडावर बुक्की मारली. नंतर त्याला खाली ओढून गाडीच्या डॅश बोर्डवर असलेले पाकीट घेवून त्यातील ३० हजाराची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली तसेच जवळ पडलेला दगड उचलून टेम्पोच्या दरवाजावर मारत नुकसान केले. 

त्याचवेळी त्या दोघांना नेण्यासाठी अ‍ॅक्टीव्हा मोपेडवर १ इसम आला व ते तिघे वाडीयापार्कच्या दिशेने पसार झाले. त्यावेळी त्यांनी रस्त्यावर टाकून दिलेली मोटारसायकल घेण्यासाठी तेथे दोघे जण आले. त्यांनी त्यांची नावे सोमनाथ रतन चव्हाण व मयुर चंद्रकांत ढाणके (रा.शिवाजीनगर, कल्याण रोड) असे सांगितले. 

तसेच ज्यांनी तुला लुटले आहे त्यातील एकाचे नाव ऋषी रासकर (रा.सारसनगर) असून त्या दोघांनी माझी ही मोटारसायकल बळजबरीने पळवून नेली होती. अशी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे स्वप्निल गंगावणे याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयीत आरोपी ऋषी रासकर याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध भा.दं.वि.क. ३९२, ३९३, ३४१, ४२७, ३४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post