भुईकोट किल्ल्यात देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अटकेत



नगर – स्वातंत्र्यदिनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जैद रशीद सय्यद उर्फ टैप्या (रा.मुकुंदनगर) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. १८) मुकुंदनगर मधून अटक केली आहे. शनिवारी (दि.१९) दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (दि.१५) दुपारी नगरमधील भुईकोट किल्ल्यात ५ मुलांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार लक्षात येताच त्या ठिकाणी तैनात असलेले लष्करी जवान व भिंगार कॅम्प पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना पकडले. तर दोघे जण पळून गेले होते. त्यानंतर सायंकाळी भिंगार पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, पो.ना. संदीप घोडके, रवींद्र दहिफळे, दिपक शिंदे यांच्या पथकाने  परवेज इजाज पटेल व अरबाज शेख या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात कलम १५३ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पकडलेल्या दोघा आरोपींचे वकीलपत्र घेण्यास न्यायालयातील वकिलांनी नकार दिला होता. न्यायालयाने दोघा आरोपींना ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडीची मुदत शनिवारी (दि.१९) संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा जैद रशीद सय्यद उर्फ टैप्या (रा.मुकुंदनगर) हा असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानेच या ५ जणांना अशी घोषणाबाजी करण्यासाठी फुस लावली असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यास शुक्रवारी रात्री मुकुंदनगर मधून अटक केली. त्याला शनिवारी (दि.१९) दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचे वकील पत्र घेण्यासही वकिलांनी नकार दिला.

Post a Comment

Previous Post Next Post