Top News

देशविरोधी घोषणा देणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार



नगर - स्वातंत्र्यदिनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात देशाच्या विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी करणाऱ्या दोघा आरोपींचे वकीलपत्र घेण्यास न्यायालयातील वकिलांनी नकार दिला असून न्यायालयाने दोघा आरोपींना ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. परवेज इजाज पटेल (वय २१, रा. अमिना मस्जिदजवळ, आलमगीर), अरबाज शेख (रा. कोठला) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातील आरोपींमध्ये तिघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

मंगळवारी (दि.१५) स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ला नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. अनेक नागरिकांनी दिवसभरात किल्ल्याला भेट दिली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास किल्ल्याच्या हत्ती दरवाजा येथील दर्ग्याजवळ पाच मुलांनी भारत विरोधी वादग्रस्त घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या लष्करी जवान प्रशांत कुमार यांच्यासह पवन सिंग, दिलीप भीषण, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पो.ना. सचिन धोंडे, पो.हे.कॉ. व्ही. एन. राठोड, म.पो.कॉ. एस. बी. साळवे, पो.कॉ. पवार यांनी तिघांना ताब्यात घेतले. तर दोघे पळून गेले. त्यानंतर सायंकाळी भिंगार पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, पो.ना. संदीप घोडके, रवींद्र दहिफळे, दिपक शिंदे यांच्या पथकाने  परवेज इजाज पटेल व अरबाज शेख या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात कलम १५३ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी परवेज व अरबाज यांना बुधवारी (दि.१६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास न्यायालयात आणण्यात आले. वरीष्ठस्तर सह दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद ज. डोंगरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी देशविरोधी कृत्य केल्याने त्याचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा निर्णय वकिलांनी घेतला. त्यामुळे सायंकाळी सर्व सुनावण्या संपल्यानंतर या प्रकरणी सुनावणी झाली. दोन्ही आरोपींना १९ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी सांगितले.

आरोपींवर कोर्टरूम मध्ये केला हल्ल्याचा प्रयत्न

संवेदनशील विषय असल्याने अनेक वकिलांनी कोर्टरूममध्ये गर्दी केली होती. याच दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता अमोल हुंबे पाटील याने कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांसमोरच आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला भारत माता की जय म्हणायलाच लावणार, असे म्हणत त्याने आरोपीला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर न्यायालयाच्या आवारात खळबळ उडाली. पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी फौजफाट्यासह न्यायालयात धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुनावणी नंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात आरोपींना एमआयडीसी येथील पोलिस कोठडीत नेण्यात आले.

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  

दरम्यान कोर्ट रूम मध्येच आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता अमोल लक्ष्मण हुंबे (वय ३२, रा. झोपडी कँटीन जवळ, सावेडी) याच्यावर रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात बंदोबस्तावर असलेले पो.हे.कॉ. रघुनाथ कुलांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अमोल हूंबे याने कोर्टरूम मध्ये आरोपीवर धावून जात सरकारी कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम १८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post