नगर - वाहतूक व्यावसायिकाकडे टेम्पोवर चालक म्हणून कामाला असलेल्या इसमाने
मालकाच्या घरात चोरी करत सोन्याचे दागिने व रोकड पळवून नेल्याची घटना केडगाव
उपनगरातील लिंकरोड वर घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संशयित वाहनचालक नागेश
रामदास शिंदे (रा. ताडेगाव, ता.अंबड, जि. जालना) याच्या
विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सोनाली अमोल वाळके (वय २५, रा.
स्वप्नपुर्ती बिल्डींग, यमुना अपार्टमेंट, लिंक रोड, केडगाव यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे पती अमोल वाळके यांचा मालाची वाहतूक करण्याचा
व्यवसाय असून त्यांच्या कडे असणाऱ्या आयशर टेम्पो वर त्यांनी नागेश शिंदे याला वाहनचालक
म्हणून कामाला ठेवले होते. मागील आठवड्यात नागेश शिंदे हा
टेम्पो घेवून जामखेड येथे गेला. मात्र तो २ दिवस होवूनही परत
न आल्याने फिर्यादी व त्यांचे पती हे जालना येथे त्याच्या घरी गेले. त्यावेळी टेम्पो त्याच्या घरासमोर दिसून आला, मात्र
नागेश तेथे नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वाळके दाम्पत्य
टेम्पो घेवून तेथून निघाले. त्यांच्या टेम्पोला भाडे
असल्याने ते बीड येथून माल भरून फलटण कडे जाताना अमोल वाळके यांनी सोनाली यांना
रविवारी (दि.२३) पहाटे मिरजगाव येथे
सोडले व ते टेम्पो घेवून फलटण ला गेले.
सोनाली या खाजगी वाहनाने सकाळी केडगाव येथे घरी आल्या असता त्यांच्या
शेजाऱ्याने त्यांना सांगितले की तुमचा वाहनचालक काल खिडकीतून घरात घुसला होता. त्यामुळे सोनाली यांनी तातडीने
घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता त्यांना आतमध्ये उचकापाचक झाल्याचे दिसून आले. तसेच कपाटातील ८ हजार ५०० रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने दिसून आले
नाहीत. त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येवून संशयित
आरोपी नागेश शिंदे विरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून
पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment