नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नगरमधील कार्यक्रमास परवानगी नाकारली


नगर - राज्यभरात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या तसेच सतत वादात सापडणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नगर शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तशी सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस संबंधित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तोफखाना पोलिसांनी बजावली आहे.

सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील मृत्युंजय युवा प्रतिष्ठानने गणेश विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (दि.२८) सायंकाळी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पोलिस प्रशासनाची परवानगी त्या मंडळाने मागितली होती. त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मंडळाचे अध्यक्ष आनंद नाकाडे व उपाध्यक्ष आकिब शेख (दोघे रा. गुलमोहर रोड) यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, दि.२८ रोजी गणेश विसर्जन निमित्त आपण आपल्या मंडळातर्फे यशोदानगर, सावेडी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या दरम्यान नृत्य कलाकर गौतमी पाटील (लावणी सम्राट) यांचा कार्यक्रम आयोजित केला असले बाबत पत्र पोलीस स्टेशन प्राप्त आहे.

सध्या नगर जिल्हयात जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश दि १४ सप्टेबर अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दि.१५ ते २८ सप्टेबर पर्यंत लागु आहेत. तसेच आपण गणेश विसर्जन दिवशी सदर कार्यक्रम घेणार असुन सदर ठिकाणी सावेडी उपनगर भागातील सर्व मंडळे हे विसर्जन मिरवणुक काढुन यशोदानगर (विहीर ) सावेडी या ठिकाणी येत असुन त्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. तसेच यापुर्वी नगर शहरात तसेच तालुक्यात गौतमी पाटील यांचे कार्यक्रम झाल्यावर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने आपणास गणेश विसर्जनाच्या दिवशी सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला किंवा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला देखील परवानगी देण्यात येत नाही.

याउपरही आपण किंवा आपल्या समर्थकाकडुन सदर ठिकाणी काही कार्यक्रम केल्यास किंवा गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केल्यास, त्यातुन काही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास आपण तसेच आपले समर्थकासह नृत्य कलाकर गौतमी पाटील (लावणी सम्राट) यांच्याविरुध्द प्रचलित कायदयानुसार योग्य कारवाई करण्यात येईल व सदर नोटीस न्यायालयात पुरवा म्हणुन ग्राहय धरण्यात येईल यांची नोंद घ्यावी.असा इशारा या नोटीस मध्ये देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post