अहमदनगर - लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या मारहाणीत केडगावच्या तरुणाचा मृत्यू झाला. रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर लोहमार्ग पोलिसांनी दोघा पोलिसांसह चौघांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तपासासाठी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग होण्याची शक्यता आहे. सीआयडीच्या अधिकार्यांनी लोहमार्ग पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली तसेच घटनास्थळाची पाहणीही केली.
विशाल धेंड (35,
रा. केडगाव, नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे तर लोहमार्ग
पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन वाकसे, करण (पूर्ण नाव नाही),
एक पोलीस व एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धेंड यांच्या मागे आई-वडील, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.
तो एका वाहतूकदाराकडे मालमोटर चालक म्हणून काम करत होता.ही घटना 1 ऑगस्टच्या दुपारी
घडली. यासंदर्भात मृत धोंडे याचा मित्र शरद पवार (रा. गाडीतळ, अमरधामजवळ, रेल्वे स्टेशन रस्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान लोहमार्ग पोलिसांच्या मारहाणीतच
धेंड याचा मृत्यू झाल्याने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा,
अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रतिक बारसे, संजय जगताप, अमोल काळपुंड, अमर
निर्भावणे, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड,
संजय भैलुमे आदींनी लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर
धोंडे याचा मृतदेह शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.
वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू शरिरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने तसेच लिव्हरला
जखम झाल्याचे आढळले.
त्यानंतर पोलिसांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक एस. जी. लोणकर करत आहेत. दरम्यान,
लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकातील फूड प्लाझा व परिसरातील सीसीटीव्ही
फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाला लोहमार्ग पोलीस विभागाचे अधीक्षक श्रीकांत देवरे
(पुणे), उपअधीक्षक महेश देवीकर (पुणे), गुन्हे शाखेचे निरीक्षक इरफान शेख यांनी भेट दिली.
Post a Comment