नगरमध्ये शिक्षकाच्या सेवापूर्ती कार्यक्रमात करण्यात आली 'ग्रंथ तुला’


नगर –  नगरमध्ये एका शिक्षकाचा सेवापूर्ती कार्यक्रम अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. त्यांनी सत्कारासाठी ‘बुके नको तर बुक (पुस्तक) आणा’ असे केलेल्या आवाहनाला कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार व जिल्हाभरातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुस्तके भेट स्वरुपात दिली. या पुस्तकांची आणि त्या शिक्षकांची यावेळी ग्रंथतुला करण्यात आली. या उपक्रमात तब्बल १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके जमा झाली असून ती विविध शाळांना वितरीत केली जाणार आहेत.

अकोळनेर (ता.नगर) येथे कार्यरत असलेले केंद्रप्रमुख किशोर हारदे हे आपल्या प्रदीर्घ शिक्षण सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल नगर मधील माऊली सभागृहात त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी  सत्कारासाठी बुके नको तर बुक (पुस्तक) आणा असा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जमा झालेल्या आणि हारदे कुटुंबीयांनी आणलेल्या पुस्तकांची व किशोर हारदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. सुमारे १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके या उपक्रमात जमा झाली.

या आगळ्या वेगळ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला ३ शिक्षणाधिकारी व ३ गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,  विविध शिक्षक संघटनांचे नेते, पदाधिकारी  तसेच जिल्हा भरातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक शिक्षकनेते डॉ.संजय कळमकर होते. तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,  माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, अरुण धामणे, माजी जि.प. सदस्य संदेश कार्ले, गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, गुलाब सय्यद, डॉ.संदीप सांगळे, रविंद्र कडूस, रविंद्र कापरे, राजेश पावसे, निर्मला साठे, राजेंद्र ठाणगे, जयश्री झरेकर, मंगल अकोलकर, संगीता हारदे, उषा हारदे, चंद्रकांत सोनार, संतोष अकोलकर, संजय कडूस आदि उपस्थित होते.

नगर जिल्ह्याला साहित्याचा मोठा वारसा आहे. त्याची जपणूक करून शिक्षकांनी मुलांना वाचनाची प्रेरणा द्यावी. ही वाचनसंस्कृती वाढण्यासाठी तिचे प्रेरक व्हावे. असे आवाहन करत केंद्रप्रमुख किशोर हारदे यांच्या सेवापूर्तीनिमित्त ग्रंथतुला करून ती पुस्तके शाळांना भेट देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले. अशोक कडूस म्हणाले, सत्काराला बुके देण्याऐवजी बुक देण्याची ही संकल्पना अनुकरणीय आहे. अरुण धामणे म्हणाले, एका शिक्षकाचा सेवापूर्तीचा एवढा मोठा व आगळा वेगळा कार्यक्रम प्रथमच होत असावा. तर किशोर हारदे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात सेवा सुरु केल्यापासून सकारात्मक विचारातून काम करत गेल्याने प्रदीर्घ सेवेत काही अडचण जाणवली नाही, माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमास ३ शिक्षणाधिकारी व ३ गट शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा भरातून शिक्षक वर्ग आला त्यामुळे आपल्या सेवेचे चीज झाले असे वाटते,

स्वागत सुदर्शन शिंदे, प्रास्ताविक बंडू जपकर, आभार भास्कर नरसाळे तर सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता काटकर, स्वाती गोरे, संजय काळे, अंबादास मंडलिक, वैभव दिघे, मारुती कुलट, मधुकर मैड, सुरेश हारदे, संजय अकोलकर गोरख नरवडे, युवराज गारुडकर, बाळासाहेब गारगुंड, संजय धामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Post a Comment

Previous Post Next Post