Top News

मध्यवर्ती बाजारपेठेतील सराफ बाजारपेठेतील पोलीस चौकीला चक्क कुलूप

व्यापार्‍यांसाठी चौकी सुरू करण्याची मागणी करणार : किरण काळे



अहमदनगर- मध्यवर्ती बाजारपेठेतील सराफ बाजारा लगत असणार्‍या पोलीस चौकीला चक्क कुलूप लागले आहे. शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकार्‍यांसह बाजारपेठेतील व्यापार्‍यांशी संवाद साधून या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी व्यापार्‍यांनी पोलीस चौकी सुरू करण्याची गरज असल्याची मागणी केली. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणारी ही पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन करण्यात येईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन काळे यांनी व्यापार्‍यांना दिले.

सराफ बाजारात मोठ्या संख्येने सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंची दुकाने आहेत. तसेच या परिसरात असणारा गंज बाजार, म हात्मा फुले भाजी मार्केट, मोची गल्ली, सारडा गल्ली असा व्यापार्‍यांच्या दुकानांनी गजबजलेला मध्यवर्ती बाजारपेठेचा मोठा परिसर आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी दुकाने आहेत. शहराच्या विविध भागातून तसेच ग्रामीण भागातून ग्राहक बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी करत असतात. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असते. व्यापार्‍यांच्या सुरक्षेसाठी तसेच बाजारपेठेत काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांची तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने पोलीस चौकी कार्यान्वित असणे आवश्यक असल्याचे व्यापार्‍यांनी काळे यांना सांगितले. 

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, पूर्वी ही पोलीस चौकी सुरू होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ती बंद आहे. कोतवाली पोलीस स्टेशन दूर अंतरावर असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने तिथपर्यंत पोहोचणे गैरसोयीचे आहे. व्यापारी, ग्राहक, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व अनुचित घटनांच्या प्रसंगी तातडीने मदत मिळण्या करिता बंद पडलेली पोलीस चौकी व्यापारी बांधवांची गरज लक्षात घेता पुन्हा कार्यान्वयीत करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन सदर पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने केली जाईल. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, उद्योग व व्यापार आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, जयराम आखाडे आदी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post