Top News

शहरात होतेयं खराब फळे व भाज्यांची विक्री; प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी



अहमदनगर - पावसाळा सुरू असुन शहरात साथीचे आजार, रोग व रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत आहेत. रस्त्याच्या कडेला बसून आठवडे बाजारात फळ- भाजी विक्री करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरील फळ-भाजी विक्री करणारे शहरात, उपनगरात व्यवसायासाठी येतात. यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे फळ - भाजी विक्री करण्यासाठी सर्रासपणे आणले जात आहे. यामध्ये सडके बटाटे, टमाटे, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर हे अतिशय नासके, कित्येक दिवसांचे खराब झालेले, टवटवीत दिसण्यासाठी अतिरिक्त विविध औषधांची फवारणी केलेले, इंजेक्शन, इन्सुलिन देऊन जास्तीची वाढ करण्यात आलेले, जीवघेणे फळ - भाज्या चढ्या भावाने विकले जात आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे असल्याचे निवेदन भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष हाजी अन्वर खान यांनी दिले आहे. अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

यामुळे प्रामाणिक फळ - भाजी विक्री करणारे शहरातील कष्टाळू विक्रेत्यांचे नाव खराब होत आहे. आणि प्रामाणिक फळ - भाजी विक्री करूनसुद्धा त्यांच्या चांगल्या मालाला योग्य भाव मिळत नाहीये. नागरिक जेव्हा फळ - भाजी खरेदी करून घरी घेऊन येतात आणि चिरले - कापले नंतर या फळ - भाज्यामध्ये मोठमोठ्या अळया, किडे निघत असून सडलेले, नासके संपूर्ण फळ - भाज्या फेकून द्यावे लागत आहे. महागड्या दराने, चढ्या भावाने आणलेले फळ - भाज्या नाईलाजाने खाऊन नागरिकांना मोठे आजार होत आहेत. यामुळे साथीचे रोग वाढले असून रुग्णही अतिशय झपाट्याने वाढलेले आहे. 

याकडे जिल्हा अन्न, औषध व आरोग्य प्रशासनाच्या सफशेल दुर्लक्षामुळे जिल्ह्यामध्ये अन्न, औषध व आरोग्य प्रशासन विभाग कार्यरत आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या विभागाकडे पुरेसे कर्मचारी व साहित्य उपलब्ध नसतील तर आवश्यकतेनुसार लवकरात लवकर पुरेसे मनुष्यबळ, लागणारे साहित्य, गरजेनुसार अधिकचा निधी, फंड व स्वतंत्र कार्यालय, विभाग मंजूर करण्यात यावे. जेणेकरून या भेसळ होत असलेल्या नासके - सडलेल्या फळ - भाज्या विक्रेत्यांवर कारवाई करणे सोपे होईल. साथीच्या रोगांना आळा बसेल व जनतेत जिल्हा प्रशासनाबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post