Top News

महिलेचा खून तिच्या पतीने व भाच्याने केल्याचे पोलिस तपासात उघड

मृतदेहाजवळील पर्समध्ये सापडलेल्या सॅनिटरी पॅडवरून एलसीबीने लावला छडा 



अहमदनगर - वांबोरी (ता. राहुरी) येथील महिलेचा कातळापूर (ता. अकोले) शिवारात गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याणी महेश जाधव (वय 25) असे मयत महिलेचे नाव आहे. तिच्या पायातील चप्पल, पैजन आणि पर्समध्ये आढळून आलेले सॅनिटरी पॅड यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. कल्याणीचा मारेकरी तिचा पती व भाचा निघाला असून पोलिसांनी त्यांना पकडल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पती महेश जनार्दन जाधव (ड़वय 31) व भाचा मयुर अशोक साळवे (वय 25 ) अशी त्यांची नावे आहेत. 

महेश वांबोरी ग्रामपंचायतीचा कर्मचारी. त्यांची पत्नी कल्याणी व दोन मुलींसह तो गावातच राहत होता. पत्नीवर त्याचा संशय होता. तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले; पण त्याची हिंमत होत नव्हती. त्याला भाचा मयुर साळवे याची साथ मिळाली. त्यांनी कल्याणी हिच्या खुनाचा प्लॅन तयार केला. त्यासाठी कल्याणीला अकोले तालुक्यातील भंडारदरा व परिसरात फिरण्यासाठी नेण्याचा व तेथेच खून करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे ते दोघे 3 ऑगस्ट रोजी कल्याणीला घेऊन वांबोरी येथून निघाले आणि काताळापुर येथे पोहचले. निर्जन स्थळ पाहून त्याच ठिकाणी कल्याणीचा गळा आवळून खून करण्यात आला. तिचा मृतदेह तेथेच टाकून ते पसार झाले. 

पूर्वनियोजिन प्लॅन प्रमाणे महेश याने पत्नी पांढरीपुल येथून हरवली असल्याची तक्रार सोनई पोलीस ठाण्यात 4 ऑगस्ट रोजी दाखल केली. या मिसिंगचा तपास सोनई पोलीस ठाण्याकडून सुरू होता. तर दुसरीकडे कातळापूर (ता. अकोले) शिवारात एका 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. सुरूवातीला राजुर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती; पण त्या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न होताच अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबी निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, संतोष खैरे, फुरकान शेख, रोहित येमुल, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, शिरसेना काळे, रोहिणी जाधव, ताई दराडे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, अरूण मोरे, भरत बुधवंत यांचे पथक या गुन्ह्याचा तपासाचे काम करत होते.

या पथकाने मृतदेह आढळलेल्या ठिकाणी भेट दिली असता कल्याणीच्या पर्समध्ये एक सॅनिटरी पॅड आणि पायातील पैजन, चप्पल मिळून आली. त्यावरून गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. सॅनिटरी पॅडवर ‘फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर’. असे लिहलेले होते. पोलिसांनी जिल्हा परिषद गाठून आरोग्य विभागातील अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता हे सॅनिटरी पॅड फक्त अनु.जातीच्या (एससी) ग्रामीण भागातील महिलांकरीताच दिले जाते व याचा पुरवठा महिला व बालविकासामार्फत अंगणवाडी सेविकांना व पुढे अनु. जातीच्या महिलांना केला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अंगणवाडी ताई, आशा सेविका यांच्या व्हाट्सऍपि ग्रुपवर कल्याणी हिचा फोटो व मेसेज व्हायरल केला. तो फोटो पाहून वांबोरी येथून एक फोन एलसीबीच्या अधिकार्‍यांना गेला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निष्पन्न झाले.

Post a Comment

Previous Post Next Post