Top News

तोतया पोलीस अधिकारी बनवून लोकांना फसवणारा भामटा पकडला

नगर - तोतया पोलीस अधिकारी बनवून लोकांची फसवणुक करणाऱ्या एका भामट्याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाईपलाईन रोड वरील सिटी लॉन्स येथे पकडले आहे. सतिष काशिनाथ झोजे (वय २९, हल्ली रा.ढवणवस्ती, तपोवनरोड,नगर, मूळ रा. मालुंजा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे या भामट्याचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शुक्रवारी (दि.२८) गोपनीय मिळाली की सतिष काशिनाथ झोजे हा भामटा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणुक करत असतो. तो सध्या स्वीफ्ट डिझायर कार (क्र. एम. एच. १२ एच. व्ही. ९०८१) ही मध्ये सिटी लॉन्स, पाईपलाईन रोड येथे उभा असून गाडी मध्ये डॅश बोर्डवर पोलीस ऑफीसर कॅप ठेवलेली आहे. अशी माहिती मिळाल्याने पो.नि.आहेर यांनी तात्काळ पो.हे.कॉ.अतुल लोटके, पो.ना.सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर गवांदे, पो.कॉ. रणजीत जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांना कारवाई साठी पाठविले.

या पथकाने तात्काळ तेथे जावून पाहणी केली, त्यावेळी एक जण कार जवळ उभा असल्याचे दिसले, या पथकाने त्यास त्याचे नाव विचारल्यावर त्याने पोलीस उपनिरीक्षक सतिष काशिनाथ झोजे (नेमणुक पोलीस मुख्यालय अहमदनगर) असे सांगितले. पथकाने त्यास त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे या पथकाने त्याचे नावाचा कोणी पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस आहे का याबाबत माहिती घेतली असता सदर नावाचा कोणीही पोलीस अधिकारी नेमणुकीस नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा तोतया पोलिस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने त्याच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे खरे नाव सतिष काशिनाथ झोजे असल्याचे सांगितले.

सदर इसमाची व त्याचे ताब्यातील गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात  सतिष काशिनाथ झोजे परि. पोलीस उप निरीक्षक या नावाची नेम प्लेट लावलेला ड्रेस, टोपी त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईन यार्ड, असा पोलीस उप-निरीक्षकाचा संपूर्ण गणवेश आढळून आला. त्यासह त्याची स्वीफ्ट डिझायर कार ताब्यात घेवून त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात भा.दं.वि.कलम १७०,१७१,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post