Top News

कत्तलची रात्र मिरवणूक शांततेत, मोहरमच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ



नगर - संपूर्ण देशात प्रसिध्द असलेल्या नगरच्या मोहरम नवमीनिमित्त शुक्रवारी (दि.२८) रात्री काढण्यात आलेली कत्तलची रात्र मिरवणूक शांततेत पार पडली. या मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्यावतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी (दि.२९) दुपारी मोहरमच्या विसर्जन मिरवणुकीला शहरात सुरुवात झाली आहे.

शुक्रवारी शहरातील कोठला परिसरात मोहरमनिमित्त सर्वधर्मिय समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. रात्री १२ वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी उठली. कत्तलची रात्र मिरवणूक कोठला राज चेंबर, कोंड्यामामा चौक, दाळमंडई, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, दादा चौधरी शाळा, कोर्टाची मागील गल्ली ते पंचपीर चावडी, बांबू गल्ली, हातमपुरा, रामचंद्र खुंट, इदगाह मैदान मार्गे कोठला येथे शनिवारी (दि.२९) सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी ही सवारी परत आपल्या जागेवर बसवण्यात आली. यावेळी अनेक भाविक टेंभे घेऊन कोठला परिसरात आले होते.

संपूर्ण मोहरम मार्गावर पोलिसांनी बॅरिकेटींग करत चोख बंदोबस्त ठेवला होता. सवारी छोटे बारा इमाम मंगलगेट याठिकाणी आली असता मोठे बारा इमाम यांची सवारी पारंपारिक पद्धतीने उठविण्यात आली. संपूर्ण शहरात छोटे बारा इमाम यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

मोहरम विसर्जन मिरवणुकीला दुपारी बारा वाजता शहरातील कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला. या हुसेन, या हुसेन अशा घोषणा.. सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. ताबूत सवारी सोबत आणि मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कोठला परिसरात ही सवारी खेळवण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

पोलिस अधीक्षक राकेश ओलांसह ११०० पोलिसांचा बंदोबस्त

कत्तलची रात्र मिरवणूकीसाठी व मोहरम विसर्जन मिरवणूकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ११०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मिरवणूक मार्गावर १०५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर लाकडी व लोखंडी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. तसेच संवेदनशिल ठिकाणी बॅरीकेटींगचे आतुन व बाहेरून बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मिरवणुकीचे दुतर्फा गल्ली बोळातुन समांतर गस्त, टॉवर बंदोबस्त, सवारी बंदोबस्त, सेक्टर बंदोबस्त, सरबतगाडी बंदोबस्त, मोबाईल गस्त व सेक्टर गस्त असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post