Top News

नगर जवळ एका घरात आढळला सैन्य दलाचा दारूगोळा



नगर - नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या पडवीमध्ये भारतीय सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यांच्या साहित्याचा मोठा साठा सापडला आहे. यामध्ये सुमारे ५० जिवंत आणि मृत बॉम्ब, तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी २५ किलो टीएनटी पावडर मिळून आली आहे. शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), एमआयडीसी पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) व आर्मी इंटेलिजन्स ब्युरो यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

दिनकर त्रिंबक शेळके याच्या घरामध्ये सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचा साठा असून तो त्याची विक्री करत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार शिवाजी ढाकणे, अमृत आढाव यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे पो.नि.राजेंद्र भोसले, पो.कॉ.सी.बी.खेडकर,.एस.कांबळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.राजेंद्र सानप, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, बाबासाहेब काळे, सुरेश सानप, आर्मी इंटेलिजन्स ब्युरो तसेच बॉम्ब शोधक पथकातील आसाराम मुटकुळे, संजय येठेकर, तवार, पळसकर, यांना सोबत घेत शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी शेळके याच्या घरी छापा टाकला.

त्या ठिकाणी घरासमोरील पडवी आणि भिंती लगत जीवंत आणि मृत बॉम्ब, तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी २५ किलो टीएनटी पावडर, ८ अम्युनेशन पिस्टल राऊंड, १६ पिस्टल राऊंड, ४० स्विचेस असा साठा मिळून आला. सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेत जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहशतवादी विरोधी पथकातील पो.ना महादेव गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४ प्रमाणे व आर्म अँक्ट कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा शेळके याच्याकडे कुठून आला आणि तो याचा उपयोग कुठे करणार होता याबाबतची माहिती पोलिसांसह आर्मी इंटेलिजन्स ब्युरो घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post