Top News

माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा



अहमदनगर - अहमदनगर महापालिकेचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शनिवारी (दि.२२) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे सादर केला. शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर कळमकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशा जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर हेही उपस्थित होते.राष्ट्रवादीकडून अभिषेक कळमकर यांच्यावर लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी टाकणार असल्याचे सांगण्यात आले. 

खा. अनिल देसाई यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे की, मागील तीन वर्षापासून मी शिवसैनिक म्हणून कार्यरत होतो. या काळात नगरकरांच्या तसेच देश आणि राज्यातील विविध प्रश्‍नांवर झालेल्या चळवळी आणि जनआंदोलनात आपण मला सहभागाची संधी दिली. एक सामाजिक आणि राजकिय कार्यकर्ता म्हणून माझ्या जडणघडणीत आपण आणि आपल्या सर्व शिवसेना पदाधिकार्‍यांचे, शिवसैनिकांचे अनमोल योगदान आणि मार्गदर्शन मिळाले. 

राज्यातील आणि देशातील बदलत्या राजकिय परिस्थितीत माझ्या क्षमतांचा व्यापक उद्दिष्टांसाठी उपयोग व्हावा, असे मला वाटते. शिवसेनेच्या मूळ धारेला अनुसरुन परंतु वेगळ्या पद्धतीने या संदर्भात काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेचा सदस्यत्वाचा राजीनामा मी देत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील शिवसैनिक किंवा पक्षनेते यांच्याविषयी कसलीही नाराजीची भावना माझ्या मनात नाही. जी आहे ती फक्त कृतज्ञताच आहे, ती आजन्म राहील, असे या पत्रात म्हटले आहे.

सुरक्षा आणि सुविधांच्या प्रश्नांवर नगरकरांचे व्यापक संघटन उभारणार

अहमदनगर शहरातील राजकारणाचे अलीकडे झालेले भयावह गुन्हेगारीकरण, त्यातून घडत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या, नगरकरांमधील वाढती भयग्रस्तता आणि नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा या स्थितीवर व्यापक भूमिकेतून आक्रमक नागरी प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले. 

गेले ३ वर्ष शिवसैनिक म्हणून अहमदनगर शहरातील प्रस्थापितांविरुद्ध श्री.कळमकर यांनी संघर्ष केला. तथापि आता व्यापक स्तरावर आणि परिणामकारक संघर्षाची गरज असल्याने शिवसेनेच्या सैनिकपदाच्या जबाबदारीतून आजपासून मुक्त होत असल्याचे श्री. कळमकर यांनी आज सांगितले. 

माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी अहमदनगरचे राजकारण गरीब आणि कष्टकरी केंद्रित केले. त्यानंतर माजी आमदार स्व. अनिल राठोड यांनी १९९० च्या दशकात नगरमधील गुन्हेगार आणि प्रस्थापितांच्या अत्याचाराविरुद्ध प्रामाणिक संघर्ष केला. संघर्षाच्या या परंपरेने नगरकरांना हिम्मत दिली. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि स्थानिक शासनाचा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभारावर यातून अंकुश राहिला. महाराष्ट्र आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरकरांना व्यापक स्तरावर संघटित करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे विरोधी पक्षांच्या राजकारणाचा सामाजिक पाया बळकट करण्याची भूमिका घेणार असल्याचेही श्री. कळमकर यांनी नमूद केले. 

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि अनिल राठोड यांचा जनसंघर्षाचा वसा यांच्याशी आजन्म बांधिलकी कायम राहील, असेही श्री. कळमकर यांनी नमूद केले. सर्व शिवसैनिकांचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवणार्‍या नेत्यांची श्री. कळमकर यांनी संघर्षात दिलेल्या सहयोगाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post