नगर - नुकतीच हत्या झालेले नगर शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मयत अंकुश चत्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर शनिवारी (दि. २२) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेशर लक्ष्मण म्हस्के (वय ३८, रा. वाकोडी, ता. नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, अंकुश चत्तर यांची नुकतीच हत्या झालेली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने किरण काळे यांनी शुक्रवारी (दि. २१) रात्री फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला. या व्हिडिओध्ये मयत अंकुश चत्तर यांची तुलना कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी करून मयत चत्तर यांच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत असे खोटे व चुकीचे वक्तव्य केले.
तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने त्या दिवशी दुकानदारांनी स्वतः दुकाने बंद केलेली असताना, काळे यांनी सदर दुकाने ही गुंडगिरी करून धमकी देऊन बंद करण्यात आले होते, अशी व्हिडिओ क्लिप तयार करून फेसबुकवर तसेच सोशल मिडियावर टाकून मयत अंकुश चत्तर यांची बदनामी केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण काळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५०० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment