नगर - अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑप. सोसायटीत सुरू झालेले ड्रेनेज लाईनचे काम मागील सहा दिवसांपासून पुन्हा बंद पडले आहे. संबंधित ठेकेदाराने लाईनच्या चेंबरसाठी कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोरच खोदकाम करून ठेवून काम अर्धवट अवस्थेतच बंद केल्याने उद्योजक, कर्मचारी आणि कंपन्यांध्ये येणार्या वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी टोलवाटोलवी करत असून ‘तुमचा-आमचा संबंध नाही, तुम्ही महापालिकेकडे जा’ अशी दुरुत्तरे ठेकेदार देत आहे. तर महापालिकेचे अधिकारीही फोन उचलत नसल्याने दाद कोठे मागायची, असा प्रश्न उद्योजक, कामगारांसमोर उभा राहिला आहे.
अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट (केडगाव) सोसायटीतील ड्रेनेज लाईन दुरावस्थेुळे येथील उद्योजक, कामगार त्रस्त झाले होते. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम हाती घेण्यात आले. काही ठिकाणी पाईप टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. तर रूपरतन कंपनी ते लक्ष्मी एंटरप्रायजेस दरम्यान ड्रेनेज लाईनचे चेंबरसाठी खोदाईचे काम करण्यात आले आहे. लक्ष्मी एंटरप्रायजेसच्या प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. तथापि खोदाई करून सदरचे काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने मागील सहा दिवसांपासून काम बंद ठेवल्याने कंपनीमध्ये ये-जा करण्यात उद्योजक, कामगारांना अडचणी येत आहेत.
कंपनीतील मालाची वाहतूक करणारी वाहनेही प्रवेशद्वारातून आत-बाहेर काढणे कठीण झाले आहे. काम तत्काळ पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केल्यानंतर त्याने तुचा- आमचा संबंध नाही, तुम्ही महापालिकेकडे जा असा अजब सल्ला दिला आहे. महापालिकेच्या अधिकार्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाहीत. जे अधिकारी फोन उचलतात ते ठेकेदाराला विचारा असा सल्ला देतात. त्यामुळे या टोलवाटोलवीत उद्योजक- कामगारांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
सोसायटीत आतापर्यंत २० ते २५ चेंबरची कामे झाली आहेत. मात्र ती सर्व चेंबर अद्याप उघडी असून, त्यावर झाकणे बसविलेली नाहीत. त्यामुळे ती धोकादायक ठरत आहेत. चेंबरच्या कामासाठी खोदाई केल्याने पिण्याच्या पाण्याचे अनेक नळकनेक्शन तुटले ओत. काही कनेक्शन पूर्ववत जोडण्यात आली मात्र त्यातून गढूळ पाणी येत आहे. तसेच काही कंपन्यांध्ये पाणीच येत नाही. त्यामुळे कामगारांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. महापालिकेने या समस्यांची दखल घेऊन ड्रेनेजच्या लाईनचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा मोठा पाऊस झाल्यास अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
Post a Comment