नगर - नगर शहरात भरदिवसा तरुणांच्या टोळक्यांनी एकमेकांना मारहाण करत चाकू आणि चॉपरने एकमेकांवर वार केल्याचे प्रकार सोवारी (दि.२४) दुपारी घडले असून यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील दोन गुन्ह्यात भा.दं.वि. ३०७ कलम तर एका गुन्ह्यात जबर दुखापतचे कलम लावण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड करत ७ ते ८ जणांना अटक केली आहे.
मारहाणीची पहिली घटना शहरातील मार्केट यार्ड परिसरात भाजीपाला मार्केट गेटजवळ सोवारी (दि.२४) दुपारी ४.३० च्या सुमारास घडली आहे. याबाबत सुमित संदीप नालकोल (वय २४, रा. आनंदबाग, विनायकनगर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुमित हा मार्केट यार्ड मध्ये एका दुकानात कामाला आहे. सोमवारी दुपारी तो मालकाने दुसर्या दुकानदाराला देण्यासाठी दिलेले ४० हजार रुपये घेवून मोटारसायकलवर जात असताना भाजीपाला मार्केट गेट जवळील एका हॉटेलसमोर समीर शेख (रा. झारेकर गल्ली, सबजेल चौक), कृष्णा गुंड (रा.दौंड रोड), परवेज सय्यद (रा.काळे गल्ली, भोसले आखाडा), नवाज सय्यद (रा.पवार चाळ, भोसले आखाडा) बसलेले होते. त्यातील समीर शेख याने सुमितला हाक मारून थांबवत ‘तू लय माजला आहेस, तुझ्या मालकाला बोलाव’, तेव्हा सुमित म्हणाला, ‘ते येथे नाहीत, तुम्ही येथून जा’, असे म्हणताच कृष्णा गुंडने त्याच्या मोटारसायकलला लाथ मारली. तर समीर शेखने त्याच्या खिशातील चॉपर काढला, हे पाहून सुमित घाबरून मोटरसायकल तेथेच टाकून भाजी मार्केटच्या गेटकडे पळाला.
त्याचवेळी तेथे त्यांचे मित्र विशाल राजेंद्र भंडारी व शुभम मारुती धुाळ हे दोघे त्याला भेटले. त्यांनी ‘‘तू एवढा का घाबरलास?’’ अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने घडलेला प्रकार सांगितला. मग विशाल भंडारी, शुभम धुमाळ बरोबर सुमितही पुन्हा चौघे बसले होते, त्या हॉटेल जवळ आले. तेथे विशाल भंडारीने कृष्णा गुंडला भांडणाबाबत विचारले असता त्याने सुमित व शुभम या दोघांना तोंडावर बुक्क्या मारल्या. नंतर नवाज सय्यद व गुंड याने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याचवेळी समीर शेख याने विशाल भंडारीवर चॉपरने वार केला. तर परवेझ सय्यदने सुमितचा गळा दाबला. विशालच्या गळ्याजवळून रक्त येवू लागल्याने शुभम धुमाळने विशाल व सुमितला मोटारसायकलवर बसवून भरधाव वेगात दवाखान्याकडे घेवून गेला, असे सुमित नालकोल याने फिर्यादीत म्हटले आहे.
तर यावेळी तेथे असलेल्या परवेझ सय्यद याला विशाल भंडारी याने मारहाण करत टोकदार वस्तूने त्याच्या हातावर व छातीवर मारुन जखमी केल्याची फिर्याद परवेझ याने दिली आहे.
चाणक्य चौकात एका तरुणावर चाकुने वार
दरम्यान जखमी झालेल्या विशाल भंडारी, सुमित नालकोल या दोघांना शुभम धुाळ हा मोटारसायकलवर कोठी ते यश पॅलेस रोडने दवाखान्याकडे घेऊन जात असताना त्यांच्या मोटारसायकलची अॅन्थनी विलास उबाळे याच्या मोटारसायकलला दुपारी ४.४५ च्या सुमारास चाणक्य चौकात धडक बसली. यावेळी अॅन्थनी मोठ्याने ओरडला असता तिघेही थांबले व विशाल भंडारी याने कशाला ओरडतोस रे, तुला लई माज आलाय का?’ असे म्हणत त्याला मारहाण सुरू केली. त्यावेळी एका मोटारसायकलवर आणखी तिघे जण तेथे आले व त्यांनीही मारहाण सुरू केली.
त्यातील संकेत खापरे याने त्याच्याकडील चाकुने अॅन्थनी उबाळे याच्या छातीवर व पोटावर वार केले तसेच तो पळत रस्त्याच्या दुसर्या बाजूला गेल्यावर शुभम धुमाळ, ऋषिकेश सोळसे, अवि जायभाय, गोविंद पवार यांनी त्याला विटाच्या तुकड्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ते तेथून निघून गेले. असे अॅन्थनी उबाळे याने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन ६ जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही मारामारीच्या घटना समजताच कोतवालीचे पो.नि. चंद्रशेखर यादव हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींची माहिती घेत अवघ्या तीन तासात दोन्ही घटनांधील ७ ते ८ आरोपींना अटक केली. यातील समीर ख्वाजा शेख, नवाज सय्यद, परवेज शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हा दाखल असल्याचे पो.नि. यादव यांनी सांगितले. दोही घटनांत अटक केलेल्या आरोपींना मंगळवारी (दि.२५) दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान शहरात वारंवार खून, खूनाचा प्रयत्नाच्या घटना घडत आहे. यामुळे शहरातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्ले करणार्यांकडून गावठी कट्ट्यांसह तलवार, चाकू, कोयत्याचा सर्रास वापर केला जात आहे, त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांकडून ठोस उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे.
Post a Comment