Top News

नगरमध्ये गावठी कट्टा, चाकू, कोयत्यासह ५ जणांची टोळी पकडली


नगर - गावठी कट्टा, चाकू, कोयता अशी शस्रे घेवून दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ पकडले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, ३ जिवंत काडतूस, बटणाचे २ चाकू, १ कोयता, लाकडी दांडके असा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी (दि.२४) रात्री १०.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील स.फौ.राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, रविंद्र पांडे, देवेंद्र शेलार, सुरेश माळी, पो.ना.विशाल दळवी, संतोष लोढे, पो.कॉ.सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, विजय धनेधर व चालक पो.कॉ.अरुण मोरे यांचे पथक सोमवारी (दि.२४) रात्री नगर शहर व उपनगर परिसरात गस्त घालत असताना पो.नि.आहेर यांनी त्यांना फोन वर कळविले की, एका राखाडी रंगाचे इरटीगा कारमध्ये काही इसम शहर परिसरात कोठेतरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने घातक हत्यारे घेवुन कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग महल रोडने येत आहेत. तातडीने जावून त्यांना पकडा अशा सूचना दिल्या. ही माहिती मिळताच सदर पथक रात्री १०.३० च्या सुमारास तपोवन रोड, भिस्तबाग महला जवळ जावुन सापळा लावुन थांबले. थोड्याच वेळात एक राखाडी रंगाची कार कॉटेज कॉर्नर रोडने महालाकडे येताना दिसली. या पथकाची खात्री होताच त्यांनी चालकास गाडी थांबवण्याचा इशारा करत कार थांबविली.

या कारमध्ये बसलेले नयन राजेंद्र तांदळे (वय २९, रा. पवननगर, पाईपलाईन रोड), लियाकत जाफर शेख (वय ३६, रा.जेऊर बायजाबाई, ता. नगर), अमोल लक्ष्मण रणसिंग (वय ३५, रा. केडगांव), धुराजी नामदेव महानुर (वय २५, रा. आष्टी, जिल्हा बीड), बजरंग नारायण मिश्रा (वय ३५, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ गावठीकट्टा व तीन जिवंत काडतुस, एक कोयता, बटनाचे दोन चाकु, विविध प्रकारचे सात मोबाईल फोन, लाकडी दांडके आढळून आले. या पथकाने हे सर्व हत्यारे आणि एक इरटीगा कार असा एकुण ४लाख ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ३/२५, /२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी नयन तांदळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द ठाणे व नगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी अमोल रणसिंग याच्या विरुध्द नगर जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा व इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. तर बजरंग मिश्रा याच्यावरही २ गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post