नगर - शहरातील उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या साईटपट्ट्यांचे काम न केल्याने सक्कर चौक ते स्टेट बँकेपर्यंतचा स्टेशन रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पुलाखालील हा रस्ता चिखलामुळे निसरडा झाल्याने, सोमवारी (दि. २४) सायंकाळी तब्बल ३० ते ३५ दुचाकीस्वार या रस्त्याने प्रवास करताना वाहन घसरून पडले. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. मात्र चिखलामुळे घसरगुंडी होत असलेल्या या रस्त्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास अपघातात बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात सोमवारी (दि. २४) दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. या पावसामुळे उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मोठ्या वाहनांच्या टायरला चिटकून मोठ्या प्रमाणात चिखल आला. या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण ठेवल्याने वाहने साईडपट्ट्यावर गेल्यास टायरला चिखल लागून तो रस्त्यावर येतो. हा चिखल रस्त्यावर पसरून संपूर्ण रस्ता निसरडा होतो. त्यावरून प्रवास करताना दुचाकीधारकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. सोवारी सायंकाळी मार्केटयार्ड चौक ते सक्कर चौकापर्यंतचा स्टेशन रस्ता दोन्ही बाजूने चिखलाने माखला होता. त्यामुळे त्यावरून वाहने घसरून अपघाताच्या घटना घडल्या.
विशेषतः मार्केटयार्ड परिसरात या रस्त्याने दुचाकीवरून जाणारे तरुण, महिला, वृद्ध असे तब्बल ३० ते ३५ वाहनधारक या रस्त्यावरून घसरून पडले. ते किरकोळ जखमी झाले. या घटना घडत असल्याने परिसरातील व्यापारी, व्यावसायिक मदतीला धावले. त्यांनी अपघातग्रस्त दुचाकीधारकांना मदत केली. त्याचबरोबर सुारे ४ तास रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना सावकाश जाण्याबाबत सूचना केल्या. एखादा दुचाकीधारक घसरला अन् त्याचवेळी मोठे वाहन पाठीमागून आले असल्यास मोठा अपघात घडू शकतो. या भीतीने व्यापारी, व्यावसायिकांनी रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना धोक्याची कल्पना दिली. तसेच निसरड्या रस्त्यावर टायर ठेवून दुचाकीधारकांना रस्ता निर्देश दिले.
परिसरातील व्यापारी मनिष गुगळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, इरफान शेख, भरत चौधरी, श्री. बडवे, श्री. केराराम, मुज्जू शेख, श्री. गफ्फार, जब्बार आदींनी वाहनधारकांना मदत केली. उड्डाणपुलाखालील स्टेट बँक चौक ते सक्कर चौकापर्यंतचा रस्ता दुचाकी स्वारांसाठी जीवघेणा ठरत असून, त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा एखाद्यास विनाकारण अपघातात आपला जीव गमवावा लागेल, अशी भीती उपस्थितांनी व्यक्त केली.
पहा व्हिडिओ -
Post a Comment