नगरमध्ये टेम्पो चालकाला लुटणारे दोघे २४ तासांच्या आत गजाआड



नगर - नगर शहरातील टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून तीस हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणेश गुलाब बडदे (वय २५ वर्षे, राहणार इंगळेमळा सारसनगर, अहमदनगर) सुमेध किशोर साळवे (वय २५ वर्षे गौतमनगर, बालिकाश्रमरोड अहमदनगर) अशी दोघा आरोपींची नावे आहे. फिर्यादी स्वप्नील रावसाहेब गंगावणे (वय १८ वर्षे, रा कवडाणे ता.कर्जत जि. अहमदनगर) हे शुक्रवारी (दि.४) पहाटे १ वाजता टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयसमोरुन त्यांच्या टेम्पो घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून गाडी फोडून ३० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती.  

याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती की, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नगर-सोलापूर रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करीत आहेत.

 पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, पोहेकॉ तनवीर शेख, पोना योगेश भिंगारदिवे, इस्त्राईल पठाण, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post