Top News

नगरमध्ये भरदिवसा ९ लाखांची रोकड चोरीला गेल्याचा केला बनाव



नगर - ९ लाख रुपये रोकड असलेली बॅग मोटरसायकल वरील अज्ञात चोराने बळजबरीने पळवून नेल्याच्या गुन्ह्यात फिर्याद देणाराच आरोपी निघाला आहे. कोतवाली पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींचा तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला असून ९ लाखांची रोकड जप्त केली आहे. शरद रावसाहेब पवार (वय ४० वर्ष, रा.द्वारकालॉनशेजारी, नेप्तीफाटा, कल्याण रोड ) असे चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

हरिभाऊ बंडुजी शिंदे (रा.चंदननगर, पुणे) यांनी कांदा मार्केट मधील अडतीवरील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी त्यांच्याकडील कामगार शरद रावसाहेब पवार याला पुणे येथे बोलावून घेत त्याच्या कडे ९ लाख रुपयांची रोकड दिली होती. शरद रावसाहेब पवार हा पुणे येथून आल्यावर आयुर्वेदिक कॉलेज ते अमरधाम रोड वरून जात असताना सोमवारी (दि.१४) दुपारी बाबावाडी समोर मोटारसायकलवरून आलेल्या चोराने त्याच्याकडील पैशाची बॅग पळविल्याची फिर्याद त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे यांचेसह गुन्हे शोध पथकाला घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली तसेच नागरिकांना विचारपूस केली असता अशी कोणतीही घटना त्या परिसरात घडली नसल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान फिर्यादी वरच शंका आल्याने त्यांनी शरद रावसाहेब पवार याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःच मालकाची रोकड चोरल्याची कबुली दिली. पैशांची आवश्यकता असल्याने ९ लाख रुपये नातेवाईकांकडे लपवुन ठेवल्याचे सांगितले. सदरची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रविण पाटील करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, पोसई प्रविण पाटील, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, याकुब सय्यद यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post