Top News

व्यापाऱ्याने बँकेत भरण्यासाठी दिलेले ३ लाख घेवून कामगार पसार



नगर - गेल्या ८ वर्षांपासून दुकानात काम करणार्‍या विश्‍वासू नोकराने बँकेत भरणा करण्यासाठी मालकाने दिलेले ३ लाख १० हजार रुपये घेवून पोबारा केला. तसेच या पैशांबाबत नातेवाईकांकडे विषय काढला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.

याबाबत व्यापारी दिनेश शामलाल नारंग (वय ४५, रा.गुलमोहोररोड, सावेडी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नारंग यांचे कापड बाजारात सावन गारमेंटस् नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात ओंकार अशोक उपाध्ये (रा.नालेगाव) हा कामगार गेल्या ८ वर्षांपासून काम करत होता. त्याने मालकाचा विश्‍वास संपादन केल्याने दुकान मालक नारंग हे दुकानातील जमा झालेले पैसे बँकेत भरण्यासाठी उपाध्येकडे देत असत. 

एप्रिलमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर २४ एप्रिल २०२३ रोजी नारंग यांनी त्यांच्या जवळील २ हजाराच्या नोटा असलेली ३ लाख १० हजाराची रक्कम मर्चंट बँकेत जमा करण्यासाठी ओंकार उपाध्येकडे दिली. मात्र तो ४ तास झाले तरी परत आला नाही. त्यामुळे नारंग यांनी मर्चंट बँकेत जावून चौकशी केली असता तो बँकेत आलाच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन केले. परंतु तो बंद होता. त्यानंतर नारंग यांनी त्याचा चुलत भाऊ संजू उपाध्ये याच्या मोबाईलवर फोन केला असता तो तुमचे पैसे देवून टाकेल तुम्ही काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अनेक दिवस त्याचा फोन बंद होता. त्यामुळे तो राहत असलेल्या परिसरात जावून पाहणी केली मात्र तो रुम सोडून दुसरीकडे राहायला गेल्याचे सांगण्यात आले.

यानंतर ४ ऑगस्ट रोजी ओंकारचा भाऊ इंद्रजित उपाध्ये याने नारंग यांना पुण्याला बोलावून घेतले त्यावेळी त्याच्याशी चर्चा करताना तुमचे ओंकारकडे असलेले पैसे आम्ही दरमहा २० हजार रुपये प्रमाणे परत देवू असे सांगितले. नारंग यांनीही त्यास सहमती दिली. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी रात्री ओंकार याने नारंग यांना फोन करुन जर माझ्या भावाकडे पैशांसंदर्भात जर बोलता तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर नारंग यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी ओंकार उपाध्ये याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ४०६ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post