अहमदनगरमध्ये एका मुस्लीम कुटुंबावर घातला सामाजिक बहिष्कार



अहमदनगर - शहरातील एका मुस्लिम कुटुंबाविरुद्ध सामाजिक बहिष्कार घातल्याच्या आरोपावरून न्यायालयाच्या आदेशाने कोतवाली पोलिसांनी खाटीक बकर समाजाचे पदाधिकारी तथा अहेले सुन्नतवल जमात बकर कसाब मशिद ट्रस्टच्या अध्यक्षांसह तिघा विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खाटीक समाजाचे पटेल तथा ट्रस्टचे अध्यक्ष शेख शौकत बादशाह, समाजाचे चौधरी तथा ट्रस्टचे उपाध्यक्ष शेख इरफान (दोघे रा. जुना मंगळवार बाजार, तवकल वस्ताद रजवाडी तालीमसमोर, खाटीक गल्ली नगर) व ट्रस्टचे उपाध्यक्ष शेख गफार अब्दुल कादर (रा. बाबा बंगाली दर्गाजवळ, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हनीफ (५६, जुना मंगळवार बाजार, तवकल वस्ताद रजवाडी तालीमसमोर खाटीक गल्ली यांनी फिर्याद दिली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हनीफ यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या तक्रारीवर ३ ऑगस्टला निकाल दिला. त्यानुसार सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६ चा कायदा महाराष्ट्र जनतेचे संरक्षण कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करत आहेत.

खाटीक समाजाच्या अहेले सुन्नतवल जमात बकर कसाब मशिद ट्रस्टच्या कारभारासंदर्भात धर्मदाय आयुक्त व पोलिसांकडे तक्रार केल्याच्या राग धरून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाची संमती न घेता खोटे ठराव दाखवून फिर्यादी मोहम्मद मुश्ताक मोहम्मद हनीफ यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करायचे नाहीत, त्यांच्याकडून बकरे खरेदीविक्री करायची नाही, असे सांगून समाजातून बहिष्कृत केले. बाजू मांडण्याची ही संधी दिली नाही. त्यामुळे आपले कुटुंब भयभीत झाले असून त्यांना मानसिक धक्का बसला आहे तसेच रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post